Thursday, 11 August 2016

प्रदूषण विरहित हवाई यात्रेसाठी नासाने केली ग्रीन टेक्नॉलॉजीची निवड

    नासा संस्थेने निवडलेले ग्रीन सिद्धांत                                                                             फोटो -नासा संस्था

       नासा संस्था - 10 ऑगस्ट
नासा संस्थेने कमी इंधनात व प्रदूषण विरहित हवाई यात्रेसाठी नवीन ग्रीन टेक्नॉलॉजीची निवड केली आहे
नासाचे संशोधक स्वच्छ व प्रदूषण विरहित हवाई यात्रेसाठी सतत प्रयत्नशील आहेत त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच त्यांनी पाच ग्रीन टेक्नॉलॉजी सिद्धांताची निवड केली आहे
संशोधकांच्या मते ह्या ग्रीन सिद्धांताचा वापर केल्यास  विमान उड्डाणामुळे होणारे वायू प्रदूषण पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत कमी होईल शिवाय विमानाच्या इंधनाचीही बचत होईल
नासाच्या ट्रान्सफॉर्मेटिव्ह एरोनॉटिक्स कन्सेप्टस प्रोग्रॅम अंतर्गत दोन वर्षे संशोधन करून संशोधकांनी ह्या सिद्धांताची निवड केली आहे
ह्या कॉन्सेप्टस अंतर्गत ,
1 -   विमान उड्डाणासाठी विजेचा वापर करणे 
2  -  अल्टरनेटिव्ह इंधनाचा वापर करणे 
3 -    3 D प्रिंटिंग टेक्निकचा वापर इलेक्ट्रिक मोटारीची क्षमता वाढवण्यासाठी करणे 
4 -    लिथियम एअर बॅटरीचा उपयोग ऊर्जा साठवण्यासाठी करणे 
5 -   नवीन मेकॅनिझमचा वापर करून विमान उड्डाणाच्या वेळी विमानाच्या पंखांचा आकार बदलणे
आणि एरोजेल ह्या वजनाला हलक्या फुलक्या असलेल्या पदार्थाचा उपयोग एअरक्राफ्टच्या अँटेना मध्ये करणे 
ह्या पाच गोष्टींचा ह्या सिद्धांतात समावेश आहे
ह्या प्रोग्रॅमचे प्रोजेक्ट मॅनेजर Doug Rohn ह्यांच्या मते ह्या नवीन सिद्धांताच्या वापरामुळे जेट विमानामुळे होणारे ध्वनी प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल
नासाचे संशोधक आता विमान उड्डाणाच्या वेळी विमानातून बाहेर पडणाऱया कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत     

Tuesday, 9 August 2016

यवतमाळ येथे भरपूर पाऊस पण अजूनही पाणीकपात सुरूच

यवतमाळ येथे जून मध्ये सुरु झालेला पाऊस आता ऑगस्ट महिन्यातही सतत बरसतच आहे कधी जोरदार तर कधी रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे यवतमाळ येथील नदी, नाले दुथडी भरून वाहात आहेत यवतमाळला पाणी पुरवठा करणारी धरणेही आता पाण्याने भरली आहेत एकंदरीत पाऊस समाधानकारक व पुरेसा पडलाय असे असूनही उन्हाळ्यात सुरु झालेली पाणीकपात अजूनही सुरूच आहे
यवतमाळकर गेल्या वर्षभर कमी पावसामुळे पाणीटंचाईच्या समस्येला साथ देत आहेत यवतमाळात आधी एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा पाणी कपातीमुळे आठवड्यातून दोनदा करण्यात आला नंतर भयंकर उन्हामुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळामुळे पाणी आठवड्यातून एकदाच सोडण्यात आले कधी उशिराने तर कधी अनियमित व कमी दाबाने अत्यंत गढूळ पाणी नळाला येत होते तरीही नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाला संयमाने साथ दिली कारण मागच्या वर्षी कमी पाऊस पडल्याने दुष्काळामुळे नदीनाले आटले होते धरणातील पाणीसाठाही अत्यल्प होता
विशेष म्हणजे  उन्हाळ्यातच लोकांनी स्वयंस्फुर्तीने धरणातील साचलेला गाळ काढला होता आणि तोही लोकवर्गणी गोळा करून
आता नदीनाले तुडुंब पाण्याने भरले आहेत धरणेही पाण्याने भरली आहेत तरीही पाणीपुरवठा मात्र अजूनही आठवड्यातून दोनदाच केला जातोय पाऊस पडल्यामुळे आठवड्यातून एकदा केला जाणारा पाणीपुरवठा दोनदा केल्या जातोय पण अजूनही तो पूर्ववत झाला नाही
राज्यात सर्वत्र जिथे,जिथे समाधानकारक पाऊस झालाय व धरणे भरलीत तिथे पाणीकपात रद्द झालीय आणि पाणीपुरवठा नियमित केला गेलाय मग यवतमाळ येथे अपेक्षित पाऊस पडला असताना व धरणे ओव्हरफ्लो झाली असतानाही पाणी पुरवठा नियमित का होत नाहीय ?
विशेष म्हणजे सरकारकडून पाणीटंचाईच्या काळात आणि नंतरही पाणीप्रश्न सोडवण्यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर झाला आणि प्राप्तही झाला तरीही पाणीकपात सुरूच आहे
निवडणुकी आधी यवतमाळला चोवीस तास पाणी पुरवठा करू असे आश्वासन देणारे नेते पाणीपुरवठा नियमितही करू शकले नाहीत त्या मुळे संतप्त झालेले नागरिक आता पावसाळ्यातील हि पाणी कपात रद्द करून दररोज पाणी पुरवठा करावा अशी मागणी करत आहेत     

Saturday, 30 July 2016

अंतराळ वीरांच्या सुरक्षित आरोग्यासाठी नवीन संशोधन संस्था स्थापीत होणार


       नासाची अंतराळवीरांगना Karen Nyberg अंतराळ स्थानकातील fundoscope ने डोळ्याचा फोटो घेताना
                                                                                                                       फोटो -नासा संस्था
नासा संस्था -30 जुलै
अमेरिकेची नासा संस्था व होस्टन मधील कॉलेज ऑफ मेडिसिन ह्यांच्या संयुक्त विद्यमाने अंतराळ वीरांना अंतराळ स्थानकात राहताना व अंतराळ प्रवासादरम्यान होणारया शारीरिक समस्येवर व आरोग्यविषयक अडचणींवर उपाय संशोधित करण्यासाठी  एका नवीन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे
नासाच्या ह्यूमन रिसर्च प्रोग्राम अंतर्गत ह्या नवीन Translational Research Institute संस्थेची स्थापना एक ऑकटोबरला होईल
नासाच्या स्पेस लाईफ व फिजिकल सायन्स रिसर्च अँड अप्लिकेशन ह्या संस्थेचे डायरेक्टर   Marshall Porterfied ह्यांच्या मते  मानवाच्या चांद्र मोहिमे अंतर्गत चंद्रावर गेलेल्या पहिल्या चांद्रयानाच्या
चंद्राच्या पृष्ठभागावरील लँडिंगला ह्या वर्षी 47 वर्षे पूर्ण होतील त्या मुळेच ह्या नवीन संशोधन संस्थेची सुरवात करण्यासाठी हा योग उत्तम जुळून आलाय
हि नवीन संशोधन संस्था विज्ञानाच्या विविध शाखेशी संलग्न असून ह्या संस्थेत मूलभूत संशोधनावर भर दिला जाईल विशेषत: अंतराळवीरांच्या आरोग्याला धोकादायक असणारया आजारावर मात करण्यासाठी हे संशोधन करण्यात येईल ह्या संस्थेत Bench to Space Flight ह्या नवीन मॉडेल पद्धतीचा उपयोग केल्या जाईल ह्या नवीन पद्धतीमुळे कमीवेळेत उपयुक्त संशोधन होईल
नासाच्या 2005 च्या अंतराळ मोहिमेदरम्यान अंतराळातील कमी गुरुत्वाकर्षणाचा परिणाम अंतराळवीरांच्या आरोग्यावर होतो हे संशोधकांच्या निदर्शनास आले वेटलेस अवस्थेत जास्तकाळ अंतराळ निवासात राहिल्यावर अंतराळ वीरांच्या मेंदूवरील प्रेशरचा दबाव व दृष्टिवर परिणाम होतो 
अंतराळवीर जेव्हा पृथ्वीवर परततात तेव्हा त्यांना दीर्घ व जवळच्या दृष्ठीदोषाची समस्या उद्भवते ह्या व इतर समस्येवर अत्याधुनिक उपाय शोधण्याचे प्रयत्न तेव्हापासूनच संशोधक करत आहेत
नासाच्या संशोधकांसोबतच इतर संस्थेतील संशोधकांनाही ह्या संस्थेत संशोधन करता येईल
अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळवीरांना येणारया समस्येवर उपाय शोधण्यासाठी ह्या नवीन संशोधनाचा उपयोग होईलच  शिवाय अंतराळस्थानकातील निवासादरम्यान त्यांना होणारया  विविध आजारावर आधुनिक उपचार करून ह्या त्रासावर व धोकादायक शारीरिक अडचणींवर मात करता येईल
ह्या संशोधनाचा उपयोग मानवाच्या आगामी मंगळ मोहिमेसाठी व ब्रम्हांडातील दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठीही उपयुक्त ठरेल

  

Thursday, 28 July 2016

यवतमाळातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे


                            दत्त चौकातील रस्त्यावरील खड्डे

यवतमाळ -28 जुलै
सध्या यवतमाळ मधील कुठल्याही रस्त्यांवर नजर टाकली कि, खड्डेच खड्डे दिसतात विशेष म्हणजे पावसाळ्या पूर्वी उन्हाळ्यात काही ठिकाणचे रस्ते दुरुस्त करण्यात आले होते आणि आता उशिराने सुरु झालेल्या पावसाला दिड महिने होत नाही तोच आणि दुरुस्तीनंतर तीन चार महिन्यातच ह्या रस्त्यांचे मूळ रूप लोकांना दिसू लागलेय
यवतमाळ येथील दारव्हा रोड ते आर्णी रोड ,वडगावरोड ,दत्तचौक ते जाजु चौक , माईंदे चौक ,वीर वामनराव चौक ,दाते कॉलेज रोड ,तिथून पुढे आर्णी नाक्याकडे जाणारा रोड ,भाजी मंडई ,आठवडी बाजार अशा यवतमाळातील असंख्य रस्त्यांची अशीच दुरावस्था झाली आहे
आर्णी रोडवरील रस्त्याचा तर काही ठिकाणी चुराडाच झालाय सर्वच रस्ते उखडले आहेत जागोजागी रस्त्याचा मुरूम बाहेर पडल्यामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडलेले आहेत ,स्पीड ब्रेकरही उखडलेल्या अवस्थेत आहेत काही ठिकाणी लोकांनी ह्या खड्ड्यात गिट्टी ,फरशीचे तुकडे भरल्यामुळे रस्त्यांवरून जाणारे नागरिक रिक्षाचालक ,दुचाकीस्वार ,गाडीवाले ह्या साऱयांनाच थोडे जरी दुर्लक्ष झाल्यास त्रास होत आहे
भाजी मंडईच्या  रस्त्यांचे खडकाळ रूप


        
दत्त चौकातून दुभाजकाचा भाजी मार्केट कडे जाणारा रस्तादेखील नुकताच दुरुस्त करण्यात आला होता विशेष म्हणजे दुरुस्ती नंतर हा रस्ता त्यात वापरलेल्या मोठ्या दगड गोटयांमुळे खडकाळ झाला होता त्या मुळे तिथून पायी जाणारया नागरिकांना आपला तोल सावरतच जावे लागत होते त्या रस्त्याचे काम अर्धवट सपाटीकरण न करता तसेच ठेवले होते त्या मुळे आपण रस्त्यावरून चालतोय का एखाद्या खेड्यातील खडकाळ पायवाटेवरून अशी शंका  नागरिकांना येत होती आणि आता तर त्या रस्त्यांची दुरावस्था झालीय तिथे मोठमोठे खड्डे पडलेत त्यातून गिट्टी ,दगड बाहेर आलेत त्या मुळे इथे भाजी घेण्यास येणारया लोकांना हा रस्ता धोकादायक ठरतोय
रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर पण रस्त्यांची अवस्था दयनीय

यवतमाळ मधील रस्ते दुरुस्तीसाठी शासनातर्फे कोट्यवधीचा निधी मंजूर झाला होता तशा बातम्याही पेपरमधून प्रकाशित झाल्या होत्या तरीही रस्त्यांचे काम अर्धवट ,निकृष्ठ दर्जाचे का झाले ? हा निधी कोठे गायब झाला? ह्याचा शोध संबंधितांनी घेणे आवश्यक आहे रस्त्यांचे काम करणारे अधिकारी ,कर्मचारी ,नगरसेवक व कंत्राटदार ह्या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे त्या साठी आता लोकांनीच जागृत होणे आवश्यक आहे कारण लोकांनीच ह्या नेत्यांना .नगरसेवक ,नगराध्यक्षांना निवडून दिले आहे आता पुन्हा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे ह्या निवडणुकी आधीच लोकांनी ह्या सर्वांना रस्ते दुरुस्त करण्यास भाग पाडावे
                                                                                  फोटो -  पुजा दुद्दलवार (BE Soft & BMC )

Monday, 25 July 2016

नासाच्या हबल टेलिस्कोपने शोधले सौरमालेबाहेरील ताऱ्याभोवती फिरणारे दोन ग्रह


                        फोटो -नासा संस्था -सूर्यमालेबाहेरील तारा व त्या भोवती फिरणारे दोन ग्रह

नासा संस्था - 24 जुलै

नासाच्या हबल टेलिस्कोपच्या साहाय्याने टिपलेल्या छायाचित्रामुळे खगोल संशोधकांना आपल्या सूर्यमाले बाहेरील दोन पृथ्वी सारख्या वातावरण असण्याची शक्यता असलेल्या नवीन ग्रहांचा शोध लागला आहे
Trappist- 1 b व Trappist- 1 c  असे नाव असलेले हे दोन पृथ्वी सदृश्य भासणारे ग्रह पृथ्वीपासून जवळपास चाळीस प्रकाशवर्ष दूर असून ताऱ्याचे वय अंदाजे पाचशे दशलक्ष असावे असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे  हे दोन ग्रह सूर्यमालेबाहेर एका लाल रंगाच्या सूर्यापेक्षा लहान व सूर्यापेक्षा थंड अशा छोटया ताऱया भोवती फिरत आहेत 
ह्या ग्रहांच्या शोध पहिल्यांदा 2015 साली इसाच्या खगोल संशोधकांनी लावला चिली मधल्या La Silla Observatory येथील Belgian Robotic दुर्बिणीच्या साहाय्याने संशोधकांनी केलेल्या निरीक्षणामुळे ह्या ग्रहांचा शोध लागला
Trappist-1 b ह्या ग्रहाला त्याच्या ताऱ्याभोवती एक परिक्रमा करण्यास दिड दिवस तर Trappist -1 c ह्या ग्रहाला एक परिक्रमा करण्यास अंदाजे अडीच दिवस लागतो 
चार मेला हे दोन्ही ग्रह त्यांच्या ताऱ्यासमोरून काही मिनिटांच्या फरकांनी परिक्रमा करत असतानाचा क्षण खगोल संशोधकांनी अचूक पकडला कारण असा योग दर दोन वर्षातून एकदाच येतो ह्या ग्रहाच्या वातावरणातुन फिल्टर होऊन आलेल्या प्रकाशाचे त्यांनी मोजमाप केले त्याचे रासायनिक पृथ:करण अजून पूर्ण व्हायचे असले तरीही तिथल्या वातावरणात हायड्रोजनचे प्रभुत्व नसल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केलाय जर वातावरणात हैड्रोजन व हेलियमचे प्रमाण जास्त असले तर जीवसृष्टी अस्तित्वात असू शकत नाही कारण अशा वातावरणात सजीव गुदमरुन मरू शकतात त्या मुळेच तिथे जीवसृष्ठी असावी अशी शक्यता संशोधकांना वाटतेय
ह्या ग्रहांचे त्यांच्या ताऱ्यापासूनचे अंतर पृथ्वीचे सूर्यापासून असलेल्या अंतरापेक्षा वीस ते शंभर पटीने कमी असून तो तारा सूर्या एवढा प्रखर तळपता नाही ह्या ग्रहांवर समशीतोष्ण वातावरण असल्यामुळे Trappist -1c वर खासकरून पाणी असण्याची शक्यता संशोधकांना वाटतेय
संशोधकांच्या एका चमूने Julien de Wit (MIT  Combridge) ह्याच्या नेतृत्वात दुर्बिणीच्या फिल्ड कॅमेरा 3 चा वापर करून ग्रहांच्या वातावरणातुन येणाऱ्या प्रकाश किरणांचे इन्फ्रा रेड लाईट मध्ये निरीक्षण केले या प्रकाशकिरणांचे Spectroscopy द्वारे पृथ:करण करून त्यांनी ग्रहांवरील वातावरणातील रासायनिक घटक शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा  त्यांना त्यात हैड्रोजन व हेलियमचे प्रमाण कमी प्रमाणात असल्याचे आढळले त्यामुळेच त्यांची तिथे जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता बळावली
अर्थात हे सध्याचे प्राथमिक निरीक्षण आहे आगामी काळात ह्या ग्रहांचे सूक्ष्म व सखोल निरीक्षण संशोधक करतील आणि त्या नंतरच ह्या दोन्ही ग्रहांचे पृष्ठभाग खडकाळ आहे का ? तिथे पाणी अस्तित्वात आहे का? तेथील वातावरण सजीवांना जिवंत राहण्यासाठी पोषक आहे का?  पृथ्वी व शुक्राप्रमाणे तेथील वातावरण विरळ आहे का? तिथल्या वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड ,ओझोन ,मिथेन व पाण्याच्या वाफेचे अंश आहेत का?  ह्याचे सखोल संशोधन केल्यानंतरच तिथे जीवसृष्ठी अस्तित्वात असल्याचे संकेत मिळतील असे मत संशोधक व्यक्त करतात



Thursday, 21 July 2016

नासाचे संशोधक साजरा करताहेत Vikingचा चाळिसावा वाढदिवस

नासाचे  पहिले  Viking यान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लॅन्ड झाले -फोटो नासा संस्था



                        मंगळ ग्रहावरील Viking यान व मंगळाचा पृष्ठभाग -फोटो नासा संस्था 

   नासा संस्था -18 जुलै
अमेरिकेच्या नासा संस्थेने मंगळमोहीमेद्वारे पहिल्यांदा Viking यान मंगळ ग्रहावर पाठवले होते त्या ऐतिहासिक  यशस्वी घटनेला वीस जुलैला चाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत 

त्याचा आनंद साजरा करण्यासाठी ह्या मंगळमोहिमेशी संबंधीत नासाचे संशोधक 19-20 जुलैला (अमेरिकन तारीख )Viking चा चाळिसावा वाढदिवस साजरा करीत आहेत  ह्या वाढदिवसाच्या आयोजना सोबतच चर्चासत्रही आयोजित केले गेले आहे
अमेरिकेने मंगळाच्या दिशेने सोडलेले Viking यान वीस जुलैला 1976 साली सकाळी  8वाजून 12 मिनिटाला मंगळावर सुखरूप पोहोचले होते  Viking च्या चाळीसाव्या वाढदिवसाच्या ह्या कार्यक्रमात 

ह्या मंगळ मोहिमेशी व आगामी मंगळ मोहिमेशी संबंधीत  नासाचे संशोधक ,तंत्रज्ञ ,अभियंते व इतर मेम्बर्स सहभागी झाले आहेत शिवाय नासाच्या स्पेस टेक्नॉलॉजीचे असोसिएट Administrator Steve Jurczyk व मंगळ मोहिमे संबंधित माहितीपर व काल्पनिक मानवी मंगळ निवासावरील  Martian कादंबरीचे लेखक Andy Weir हे देखील सहभागी झाले आहेत ह्या कार्यक्रमात जवळपास वीस वक्त्यांच्या परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले आहे
एकोणीस व वीस जुलैला साजरा होणाऱया ह्या कार्यक्रमात नासाच्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमचे इतिहासकार Roger Launius ह्यांनी नासाच्या ऐतिहासिक Viking मंगळ मोहिमेबद्दल माहिती दिली Martian कादंबरीचे लेखक Andy Weir हे मंगळ ग्रहावरील भावी मानवी निवासाबद्दल बोलले तर नासाचे मुख्य संशोधक Ellen Stofan ह्यांनी  Exploration of Marsबदल माहिती दिली
1976च्या वीस जुलैला  Viking 1  हे यान मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हाचे हे छायाचित्र आहे त्याच वर्षी  सप्टेंबर मध्ये Viking 2 हे ऑर्बिटर मंगळ ग्रहाभोवती फेरया मारू लागले ह्या दोन मंगळ मोहिमांमुळे संशोधकांना मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाची रचना ,तिथले खडक तिथे पूर्वी पाणी वाहात असल्याच्या ,डोगर ,दऱ्या ,पाण्याचा आटलेला नदी प्रवाह व तिथल्या गोळा केलेल्या माती व खडकातील मिनरल्स मुळे तिथे पूर्वी असलेल्या सजीवांच्या अस्तित्वाच्या खुणा सापडल्या आहेत
आता नासाचे संशोधक मंगळ ग्रहावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहेत 



Wednesday, 20 July 2016

नासाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेय अत्याधुनिक 2020 मार्स रोवर

                                                      नवीन 2020 मार्स रोवर             फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 20 जुलै
नासाच्या तंत्रज्ञांनी  2020  सालीच्या मंगळ मोहिमेसाठी अत्यंत कठोर परिश्रम करून व आधुनिक तंत्रज्ञान वापरून  विकसित मार्स रोवर तयार केले आहे व हे मार्स रोवर 2020 सालीच्या उन्हाळ्यात पृथ्वीवरून अंतरिक्ष यानातून मंगळ ग्रहावर पाठवले जाईल व 2021 च्या फेब्रुवारीमध्ये ते मंगळ ग्रहावर पोहोचेल
हे सहाचाकी मार्स रोवर आधीच्या 2012 सालच्या मंगळ मोहिमेतील Curiosity रोवर सारखे दिसत असले तरी त्यात अनेक सुधारणा केल्या आहेत ह्या नवीन 2020 मार्स रोवरचा खर्च व धोका कमी करण्यासाठी त्याचे बाह्यरूप आधीच्या मंगळ मोहिमेतील Curiosity सारखेच ठेवले आहे मात्र आधीच्या मार्स रोवर मध्ये नसलेल्या अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणाचा व सुविधांचा त्यात समावेश केला आहे
हे  मार्स रोवर त्याला असलेल्या आधुनिक रोबोट आर्म,सेन्सर व कॅमेऱ्याच्या साहाय्याने अशा ठिकाणाचा शोध घेईल जिथे आधी जीवसृष्ठी अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतील नवीन Range ट्रिगरमुळे रोवरचा वेग व दिशा ह्यांचे नियंत्रण करता येईल रोवर वरील कॅमेरा व मायक्रोफोनचा संच मंगळावरील पूर्वी न पाहिलेले दृश्य टिपेल व आवाज रेकॉर्ड करेल व पृथ्वीवरील संशोधकांना ऐकवेल 
मंगळावर मानवाला जाण्यासाठी व राहण्यासाठी आवश्यक वातावरण त्या ठिकाणी आहे का ? असल्यास मानवाला आवश्यक असलेले ऑक्सिजनचे योग्य प्रमाण व अस्तित्व तिथे आहे का? असे मानवाला पूरक वातावरणाचे ठिकाण रोवर तिथे शोधेल
तिथल्या वातावरणात पॅराशूट कसे उघडते ते अजूनही कोणी पाहिले नव्हते पण आता ते पाहायला मिळेल मार्स रोवरच्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने रोवरचे मंगळाच्या पृष्ठभागावरील लॅण्डिंगचे ठिकाण दिसेल त्या मुळे नकाशाच्या साहाय्याने ते ठिकाण योग्य आहे की नाही हे शास्त्रज्ञांना ठरवता येईल व ते ठिकाण पाहिजे तेव्हा त्यांना बदलताही येईल
मायक्रोफोनमुळे पहिल्यांदाच मंगळावरील आवाज ऐकण्याची सुवर्णसंधी संशोधकांना मिळणार आहे
नासाच्या 2008 च्या Phoenix Mars Lander  ह्या आधीच्या मंगळ मोहिमेतही मायक्रोफोन होते पण त्याचा   प्रत्यक्ष वापर करण्यात आला नव्हता आता नवीन रोवर मधल्या मायक्रोफोनचा मात्र उपयोग होईल असे नासाच्या 2020 मंगळ मोहिमेचे डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर Matt Wallase ( JPL ) ह्यांना आशा वाटतेय
ह्या नवीन मार्स रोवर मध्ये ड्रिल मशीन बसवलेली असून त्या द्वारे मंगळावरील पृष्ठभागातील दगड फोडून व माती खणून मिनरल्सचे नमुने गोळा केल्या जातील व अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या सुविधेमुळे तिथल्या दगडाचे छायाचित्र पाहून त्याचा प्रकार ठरवता येईल संशोधकांना आवश्यक असलेल्या प्रकाराचा खडक शोधून त्याचे जवळून निरीक्षण ह्या मुळे करता येणार आहे
रोवरच्या रोबोटिक हाताने हे नमुने गोळा करून तिथे असलेल्या रॅक मधील जवळपास तीस सॅम्पल टयूब मध्ये व्यवस्थित भरून सील केल्या जातील व पृथ्वीवर आणले जातील ह्या नमुन्यावर नासाच्या प्रयोग शाळेत पृथ:करण करून सखोल संशोधन केल्यानंतर संशोधकांना मंगळावर खरेच जीवसृष्ठी अस्तित्वात होती की नव्हती ह्या गोष्ठीचा आणखी सबळ पुरावा मिळेल
एकदा का ह्या मोहिमेला अंतिम मंजुरी मिळाली की,मार्स रोवरची टेक्निकल व प्रोग्रॅमॅटिक review प्रोसेस साठीच्या KDP ह्या कठीण चाचणीचे चार टप्पे यशस्वीपणे पार करावे लागतील ज्यात concept पासून टेस्टिंग पर्यन्तच्या सर्व बाबींचा समावेश असेल
मार्स 2020 मंगळ मोहिमेचे प्रोग्रॅमर व नासाच्या वॉशिंग्टन येथील मुख्यालयाचे Executive GeorgeTahu (JPL) ह्यांनी दिलेल्या माहिती नुसार मार्स 2020 रोवरचे  डिझाईन Curiosity सारखेच ठेवून स्पेस हार्डवेअर देखील बरेचसे सारखेच वापरण्यात आले आहेत त्या मुळे रोवरने पहिला व दुसरा टप्पा यशस्वीपणे पार केला असून आता त्याचा तिसरा टप्पाही पार पडला आहे त्या मुळे 2020 मार्स रोवर शेवटच्या चवथ्या व अंतिम चाचणीकडे वाटचाल करत आहे
हि  2020 मार्स रोवर मोहीम नासाच्या मार्स एक्सप्लोरेशन प्रोग्रॅमचाच एक भाग आहे सद्या यात दोन अक्टिव्ह रोवर व तीन यानांचा समावेश आहे 2018 मध्येही एक स्थिर लॅण्डर पाठवण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे ह्या मुळे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाखालील अंतर्गत भागाचीही सखोल माहिती मिळेल   
हे संशोधन आगामी मंगळ मोहिमेसाठी महत्वाचा टप्पा ठरेल शिवाय नवीन संशोधित माहिती आगामी मानवाच्या मंगळ यात्रेसाठी व त्याच्या तिथल्या भविष्यातील निवासासाठी मैलाचा दगड ठरेल