Saturday 1 February 2020

सरस्वती मंदिर सव्वाशे वर्षात पदार्पण करतेय

                   सरस्वती मंदिर सव्वाशे वर्षात पदार्पण करतेय आणि त्या निमित्याने माजी विद्यार्थीनी संमेलनाचे आयोजन करण्यात आलय हि बातमी कळाली तेव्हा आमची शाळा इतक्या वर्षांची शैक्षणिक परंपरा जपत आजच्या स्पर्धात्मक युगातही यशस्वीपणे मार्गक्रमण करतेय हे पाहून आनंद झाला आणी आपल्याही नकळत आपल्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त झालेल्या शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या
सिद्धेश्वर तळ्याच्या गणपतीघाटाजवळची आमची सरस्वती मंदिरची तीन मजली शाळा एका बाजूने किल्ल्याची भक्कम तटबंदी बाजूला चर्च समोर सेंट्रल टॉकीज आणि नवीपेठेतील मुख्य बाजारपेठ जवळच बस स्टॉप पण शाळेच्या रूटवर खूप कमी बस धावत स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातील पारतंत्र्याच्या झळा सोसलेले आमचे पालक आणि शिक्षक स्वातंत्र्याची पंचवीस तीस वर्षे उलटल्यानंतरही कडक शिस्तीचे आणि कठोर मनोवृत्तीचे! टीव्हीच्याही आगमनाआधीचा तो काळ स्त्री शिक्षणासाठी प्रचंड संघर्षाचा!आणि शिक्षणच नाही तर आवडता वेष परिधान करण्यासाठी सुद्धा! नऊवारी आवडीने नेसणाऱ्या आजच्या पिढीला आश्चर्य वाटेल पण आज साठी पंच्याहत्तरीतल्या महिला सहजतेन सलवार कमीज किंवा इतर ड्रेस घालू शकतात पण तेव्हा शाळेत सलवार कमीज घालणही सहज शक्य नव्हत आज मुली सहजतेन सर्वच क्षेत्रातील शिक्षण घेऊ शकतात उच्च शिक्षणासाठी नोकरीसाठी परदेशीही सहजतेने जाऊ शकतात पण तेव्हा ग्रॅज्युएट होण देखील कित्येकांना अशक्य होत
 सोलापूरच्या वृत्तवेध ह्या लोकल चॅनल वरून सरस्वती मंदिर शाळेचा प्रसारित झालेला वृत्तांत
            व्हिडिओ -सौ .नीता येरमाळकर कडून प्राप्त
शाळेतल वातावरण कडक शिस्तीच पण शैक्षणिक बांधिलकी जपत उत्कृष्ट शिक्षण देणार तेव्हा वाळवेकर सर मुख्याधापक होते खूपच कडक आणि करारी! शाळेला पोहोचायला पाच मिनिटे जरी उशीर झाला तरी बंद फाटक उघडण्याची परवानगी देत नसत त्यामुळे सहसा कोणी उशीर करत नसत शाळा बसच्या रूटवर नसल्यामुळे कित्येक विद्यार्थिनींना पायीच अनेक चौक पार करत शाळेत पोहोचायची घाई असे कारण तेव्हा मुलींकडे किंबहूना  कित्येक पालकांकडेही बाईक किंवा सायकल नसे आता मागे वळून पाहताना आपण किती दूरवर पायी चालायचो हे पाहून आश्चर्य वाटत पण त्या मुळेच आम्हाला वेगळ्या मॉर्निग वॉकची गरज नसे
शिक्षणाप्रती असलेल्या शिक्षकांच्या प्रामाणिक बांधिलकीमुळे आमचे शिक्षक आत्मीयतेने आपुलकीने विद्यार्थ्यांना शिकवत त्या वेळेस म्हणूनच ट्युशन्सची गरजही नव्हती आणि प्रस्थही! शिक्षणाच बाजारीकरणही झाल नव्हत तेव्हा!आजकाल अनेकदा शैक्षणिक क्षेत्रातल्या भ्रष्ठाचाराच्या,शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा लावणाऱ्या शिक्षकांच्या बातम्या वाचण्यात आल्या की आमच्या शाळेतल सुरक्षित आश्वस्थ वातावरण आठवत  आजकालचे सहजतेन सामूहिक कॉपी करणारे विद्यार्थी आणि त्यात शिक्षकांचाही सहभाग असल्याच्या बातम्या वाचून,पाहून आम्हाला आमच्यातली निकोप स्पर्धा आणि प्रामाणिक पणे अभ्यास करून आम्ही दिलेली कडक वातावरणातली परीक्षा आठवते मार्क वाढवणे,पेपर सेट करणे असला प्रकार तेव्हा नव्हताच कॉपी करण दूरच तसा प्रयत्नही कोणी केला तर त्याला शाळेतून बाहेर काढल जाई तेव्हा मेरिट येण फर्स्ट क्लास मिळवण खूप कठीण होत कित्येकदा पेपर बरोबर लिहूनही मार्क कमी पडले तरी पुन्हा रिटोटल करायची भीती असे कारण अजून मार्क कमी तर होणार नाहीत ना अशी भीती असायची आता मात्र एखाद्या हुशार विध्यार्थ्याला रिटोटल च काय पेपरची झेरॉक्स प्रत मिळतेय ही खरच चागंली बाब आहे आता कॉम्पुटर,मोबाईलच्या एका क्लीकवर जगभरातील हवी ती माहिती एका क्षणात मिळते पण तेव्हा आम्ही शिक्षकांनी शिकवलेल्या शिक्षणावरच अवलंबून होतो ऑफ पिरियडला लायब्ररीतील पुस्तके वाचून दाखवत तेव्हा उत्तमोत्तम लेखकांची ओळख होई त्या वेळेस सावरकरांच्या "ने मजशी ने " सारख्या देशभक्ती जागी करणाऱ्या कवितांमुळे किंवा "एक तुतारी द्या मज आणून फुंकीन मी ती स्व:प्राणांनी" सारख्या केशवसुतांच्या कवितांनी जागृती निर्माण होई आताच्या भ्रष्टाचार बोकाळलेल्या वातावरणात तर अशा कवितांची आवर्जून पुन्हा गरज निर्माण झालीय
आमच्या जोग,बाग,रिसबूड मॅडम खेळाच्या नाडकर्णी मॅडम खूप छान शिकवत त्या विद्यार्थिनीत लोकप्रिय होत्या
आमच्या दोघीतिघींचे पेपरमधले चांगले निबंध वर्गात मॅडम वाचून दाखवत आणि नीटनेटके पेपरही दाखवत त्या मुळे आपसूकच प्रोत्साहन मिळायच आमचे सायन्सचे पाठक सरही छान शिकवायचे माझ्याकडून आणि माझी मैत्रीण नेने कडून (आमच अक्षर चांगल असल्याने) सर नोट्स लीहून घेत आणि फळ्यावर चिटकवत पण अचानकच ते हे जग सोडून गेले तेव्हा त्यांच्या जाण्याच दुःख: कित्येक दिवस विद्यार्थिनींच्या मनात होत
आमच्या वेळेस विद्यार्थ्यांना कडक शिक्षा करण्याच कधी कधी छडीने मारण्याच पूर्ण स्वातंत्र्य शिक्षकांना होत पालक कधी तक्रार करत नसत आणि विद्यार्थीही,कारण घरी तक्रार केली कि डबल मार मिळण्याची भीती असे सुदैवाने आमच्यावर कधी तशी वेळ आली नाही
शाळेत शारदा,हादगा स्नेहसंमेलन उत्साहात पार पडायच शाळेच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींना आपली कला सादर करायची संधी मिळे अर्थात निवड शिक्षकच करत आमच्या ग्रुपचा दरवर्षी त्यात सहभाग असायचा त्या निमित्ताने निघालेल्या स्मरणिकेत लेखनाची संधी मिळे स्मरणिकेतूनच मला पहिल्यांदा लेखनाची संधी मिळाली पण मी तो लेख माझ्या लहान बहिणीच्या नावाने लिहिला होता तो छापून आला आणि सर्वांना आवडलाही होता पण तो लेख मी लिहलाय ते ना तीने सांगितले ना मी! आता खूप लेख छापून आलेत पण तेव्हाचा पहिल्या लेखाचा तो आनंद अविस्मर्णीयच!
आमच्या वर्गात दोन जोडगोळ्या होत्या लिमये भगीनी सेम टु सेम ओळखण खूप कठीण!पण एकीच्या कानात रींग होती त्यावरुन आम्ही ओळखायचो तर दुसऱ्या भट्टड भगीनी माझ्या ग्रुपमधल्या माझ्या खास मैत्रिणी तेव्हाचे शाळेपासूनचे मैत्रबंध अजूनही घट्ट आहेत!
आमच्या शाळेसमोरच सेंट्रल टॉकीज होत शहरातल्या पंधरावीस टॉकीजच्या तुलनेत साधारणच पण आतासारख शाळेला किंवा पिरियडला बंक मारून कोणी सिनेमाला जात नसत शाळेतर्फे जर एखादा चांगला सिनेमा आला तरच तो पाहायला नेत तेव्हाच ते टॉकीज आतून पाहायला मिळायच आमच फाटक मधल्या सुट्टीतही उघडत नसत त्याच कारण आमच्या शाळेतून सरला येवलेकर सिनेमात काम करण्यासाठी पळून गेली अस सांगत अर्थात ते कितपत खर होत ते सरला येवलेकरलाच माहीत
आमच्या सुदैवाने आम्हाला शशिकला ह्या अभिनेत्रीला पाहायला मिळाल होत शशिकला तेव्हा प्रख्यात सिने अभिनेत्री होती ती खूप सुंदर होती पण ती खाष्ट नणंदेच्या भूमिका जास्त करायची तीच घर आमच्या वर्गमैत्रिणीच्या घरासमोरच होत ती तेव्हा खूप बिझी होती कधी कधी ती सोलापूरला यायची एकदा ती आल्याच आम्हाला कळाल तेव्हा तिच्या आणि घरच्यांच्या परवानगीने आम्ही मैत्रिणीनी तिच्या भेटीची वेळ ठरवली पण आम्हाला जायला उशीर झाला आणि शशिकलाच्या व्यायामाची वेळ झाली त्या मुळे तिने आम्हाला दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावल मात्र आम्ही तिला व्यायाम करताना मैत्रिणीच्या गच्चीवरून पाहिल गुलाबी रंगाच्या सलवार कमीज मध्ये शशिकला खूपच लहान आणि सुंदर दिसत होती तिच्याशी संवाद साधायच मात्र राहूनच गेल तिला अचानकच  मुंबईला जाव लागल पण तो क्षण अविस्मरणीय होता! तेव्हा आजच्या सारखा टीव्ही मोबाईल नव्हता
आणि सिनेतारे फक्त सिनेमातच पाहायला मिळायचे त्यांची एक झलक पाहायला मिळावी म्हणून लोक धडपडत असत आता चोवीस तास सिनेतारे सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधतात त्यांच्या मुलाखती पाहायला मिळतात पण तेव्हा आतासारखी फोटोक्रांती,मोबाईल क्रान्ती झाली नव्हती आमच्या शालेय जीवनाच्या शेवटी फक्त मुंबईत टीव्ही आला होता पण आम्हाला आमच्या शाळेत टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण कस दाखवतात ह्याच प्रात्यक्षित तिथून आलेल्या टीमने दाखवल होत
शाळेतल्या शेवटच्या वर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकाच्या भूमिकेत शिरल्यावर शाळेचा कारभार सांभाळताना उडालेली आमची तारांबळ निरोप समारंभाचा भावुक क्षण आता पुन्हा एकदा नव्याने बाहेरच्या जगात एकट्याने पाऊल टाकायला सज्ज झालेले आम्ही  शाळेतल्या शैक्षणिक अनुभवांची शिदोरी घेऊन इथे भेटलेल्या आणि मैत्रीच्या सुरवातीच्या कोवळ्या धाग्यांनी एकत्र बांधलेल्या मत्रिणीसोबत तर कधी त्यांच्या  आठवणी सोबत! आज इतक्या वर्षांनंतरही आम्हा मत्रिणींचे बंध अजूनही घट्ट आहेत आताच्या Whats app मुळे सहजतेने रोज संपर्कात आहोत ते ह्या शाळेमुळेच आता माजी र्विद्यार्थीनी संमेलनामुळे अशा अनेक मैत्रिणी कित्येक वर्षांनी एकत्र येतील आणि संवाद साधत शाळेतल्या आठवणींना उजाळा देतीलआणि नवी ऊर्जा घेऊन बाहेरच्या जगाला सामोरे जातील !
                             "शाळेच्या 125 व्या वर्धापन दिनानिमित्य हार्दिक शुभेच्छा !"


No comments:

Post a Comment