Tuesday 4 March 2014

हुरडा पार्टी

    परवा किराणा मालाच्या दुकानात मला हुरड्याच packet दिसलं काहीजण किराणा मालासोबत हुरडा घेत होते ते पाहून मनात आल ,अरे हुरडा आता वाण सामानात सामील झालाय की ! तस हुरड्याच मार्केटिंग नव नाही.पुणे मुंबई साईडला "हुरडा पार्टी " असा बोर्ड लावलेल्या हॉटेलात ताजा हुरडा भाजून मिळतो अस वाचल, ऐकल आणि प्रत्यक्षात प्रवासा दरम्यान पाहिलही होत पण हे लोण खेड्यापर्यंत पोहोचायला तसा वेळ लागला मार्केटात कधी कधी हुरडा विक्रीसाठी येतोही पण असा हुरडा विकत आणुन घरी भाजून खाण सारयांनाच रुचत अस नाही, मागच्या वर्षी तर नागपूरच्या बर्डी भागात मी हातगाडीवर हुरडा विकताना विक्रेत्याला पाहिलं तेव्हा वाटलं , आता हि हातगाडी घरा,घरा पर्यंत पोहोचली तर नवल वाटायला नको .बायकाना घरबसल्या भाजी सोबत हुरडाही मिळेल पण खरच त्याला शेतातल्या "हुरडा पार्टी " ची लज्जत असेल?
        पावसान चिंब झालेली धरणी थंडीन शहारली की थंडीची चाहूल लागते शेतातली हिरवीगार कोवळी हुरड्यावर आलेली ज्वारीची कणसे वारयासोबत डोलू लागतात .प्रवासात अशी कणस पाहिली की ,मनाची मरगळ दूर होते मग अशा कोवळ्या हुरड्याची चव शेतात जाऊन चाखण म्हणजे सुखद पर्वणीच असे .पूर्वी शहरात , खेड्यात हुरडा पार्ट्या रंगत.
       हुरडा पार्टीचा बेत आखताच शेत मालक आपले आप्त स्वकीय ,मित्र,परिचित सारयांना निमंत्रण देत.शेतात जाण्यासाठी सोयीनुसार रेल्वे,बसन जाण सुखर असल तरी कधी,कधी ट्रक किंवा क्वचित प्रसंगी बैलगाडीचा प्रवास अनोखा पण त्रासदायक असे विशेषत: तरुणाईला तर अशा वेळेस कधी एकदा शहराबाहेर पडतो अस झालेलं असे अर्थात शेतातल्या हुरडा पार्टीच्या आंनदात त्याचा विसर पडे शेतात जाण्यासाठी बहुदा ट्रकच ठरविल्या जाई कारण जाण्या,येण्याच्या वेळेवर त्या मुळे बंधन नसे.
            शेतात जाण्यासाठी बहुदा सुटीचा दिवस ठरवल्या जाई जायच्या दिवशी सकाळी लवकरच सारे जमत ज्यांना पोहोचायला वेळ होई त्यांच्या कडे माणूस पाठवल्या जाई ट्रक मध्ये चढण्यासाठी कसरत करावी लागे ट्रक जवळ स्टूल ठेवून गडी एकेकाला आत चढवत आत गादया घालून बसण्याची सोय केलेली असे सारे आत चढले कि दरवाजा बंद केल्या जाई एकदाका प्रवास सुरु झाला कि मग बायकांच्या गप्पात,गाण्याच्या भेन्ड्यात शेत कधी आल हे समजतही नसे मग पुन्हा उतरण्याची कसरत होई.
            शेतातच साफ केलेल्या जागेवर सतरंजी घालून बसण्याची सोय केलेली असे . मग तोडलेला ऊस ,बोर.चिंचा ,ढाळा {हरबरा } ,पेरू असा गावरान नास्ता होई . ऊस कोणी स्वत: सोलुन खात तर काहींना गडी सोलून देत नंतर शेत मालक ,मालकीण सारयांना शेत दाखवायला नेत वाटेतले काटे चुकवत ,पाटातल्या झुळझुळनाऱ्या पाण्याची चव चाखत ,झाडावरच्या खुणावणाऱ्या ताज्या चिंचा ,पेरू ,बोर ह्यांचा आस्वाद घेत सारेजण शेतातली सैर करीत ह्या अवीट चवीच्या फळांची चव शेतातच अनुभवावी !
          शेतमजूर तोवर शेतातली कोवळी ,लुसलुशीत कणसे तोडून आणत .शेतातच खड्डा करून तिथे कणसे भाजण्यासाठी जाळ केलेला असे शेतमजुरांच्या बायका भाजलेला हुरडा चोळून पाखडून ,मुठी मुठीने सारयांना देत सोबत शेतातली कोवळी वांगे भाजून देत हि वांगी शेंगाच्या चटणी सोबत खाल्ली जातात हुरड्या सोबत शेंगाची चटणी ,गुळ ,तीळ ,खसखस व खोबर घालून केलेलं तोंडी लावण असा मेनू असे हुरडा खाल्ल्या वर पाणी प्यायला देत नसत.
                हुरडा खावून झाला कि मग पुन्हा काही जण शेत पहायला जात ,लहान पोर फुलपाखरू ,पाकोळी पकडायला धावत काहींच्या गप्पा रंगत काहीजण गाणी म्हणत तर काही गाण्यांच्या भेंड्या खेळत.तोवर जेवणाची वेळ झालेली असे .शेतात स्वयंपाकाची सोय असेल तर शेतातच पातळ चुलीवरच्या भाकरी ,पिठलं ,पेंडपाला ,मसाला वांगी भाजी ,शेंगाची चटणी ठेचा ,लोणी ,दही असा साग्र संगीत मेनू असे जर शेतात जेवण बनवण्याची सोय नसेल तर घरूनच दशम्या ,गुळाच्या दशम्या ,थालीपीठ ,पुरी भाजी ,धपाटे (विदर्भातले धापडे ) ,चटणी ,लोणचे भाताचे प्रकार ,झुणका वैगरे घरूनच आणत शेतात जर गुऱ्हाळ असेल तर त्याची काकवी पोळी सोबत तूप घालून खायला देत.सोलापुरात "वेळ आमावश्या" ला शेतात जेवण देत तेव्हा बाजरीची भाकरी व इतर मेनू असे शेताच्या आसपास जर नदी व धरण असेल तर तेही पाहायला लोकांना नेत पुन्हा दुपारनंतर कोणाला हुरडा हवा असेल तर भाजून देत सारयांना चहा ऐवजी ग्लास भर ताक प्यायला देत . ऊन उतरणीला येऊ लागली कि अंधारून यायच्या आत सारयांना परतण्याची घाई लागे.परतताना निरोप देताना.शेत मालक,मालकीणीच्या चेहरयावर सारयांना हुरडा खाऊ घातल्याच समाधान दिसे सारयाना भाजलेला हुरडा सोबत बांधून दिल्या जाई मोकळ्या हवेतल्या हुरडा पार्टीचा सुखद अनुभव मनात साठवत सारे परतीच्या वाटेला लागत.
              प्रांतानुसार हुरडा पार्टीच ,हुरडा खाण्याच स्वरूप वेगळ असत हे मला विदर्भातल्या हुरडा पार्टीत कळाल इथे हुरड्या सोबत तिळाची चटणी,दही दिल्या जात. हुरडयात दही चटणी मिसळून भेळी सारखी खाल्या जाते जेवणात जाड भाकरी असते सोबत ठेचा ,मिरच्या ,पिठल, भरीत,लोणी ,दही असा मेनू असतो.भाजलेला हरबरा त्याला हुळा म्हणतात तोही खायला देतात.मला आमच्या मारवाडी स्नेह्याकडे हुरडा बारीक करून तिखट फोडणी देवून कण्या सारखा किव्हा गोड गुळ घालून शिरयासारखा करून खाल्ला जातो हे कळाल. विदर्भात गव्हाच्या कोवळ्या ओम्ब्याही भाजून ,भरडून त्यात साखर,तूप घालून लाडू करून किव्हा खीर करून खातात.
आमच्या काँलेजमधल्या मारवाडी मैत्रिणीच्या शेतातल्या पार्टिची आठवण अजूनही आठवते तेव्हाचे अविस्मरणीय, क्षण,हुरड्यासोबतच्या गप्पा कडक शिस्तीतल्या आम्हाला मिळालेल नीवांतपण अन सोबत हुरड्याची लज्जत!
                      हुरडा पार्टीच स्वरूप कसही असल तरी शेतात जाऊन हुरडा खाण्याची मजा काही औरच ! आताची पिढी ह्या आनंदाला मुकतेय खरी !पण वाढती महागाई ,हरवत चाललेली माणुसकी ह्या मुळे हुरड्याच मार्केटिंग झाल तर नवल नाही पण म्हणूनच तर शेताजवळच्या हॉटेलात हुरडा गरमागरम भाजून मिळतोय बदल म्हणून हा नवा बदल चांगला असला तरी खर्चिक मात्र आहे.तसही नोकरी ,धंद्याच्या ,निमित्याने शेत बटाईने दिल्यामुळे आपल शेत असूनही आपल्या शेतातला हुरडा खायला मिळतोच कुठे?

No comments:

Post a Comment