Monday 13 January 2014

गड्ड्याची जत्रा

                          नुकतीच सोलापुरात दहशतवादी संघटनेशी संबंधीत   सिमीच्या दोन कार्यकर्त्यांना सिद्धेश्वर यात्रेच्या वेळेस घातपाती कारवाई करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली ह्या साठी मध्य प्रदेश पोलिस व ए. टी एस च्या सतर्क पोलिस यंत्रणेच कौतुकच करायला हव.
                             हि सिद्धेश्वर यात्रा कित्येक वर्षापासून अगदी आमच्या जन्माच्याही आधीपासून निर्विघ्न पार पडत आलीय हि यात्रा संक्रांतीला भरते.अजूनही मला  मकर संक्रांतीच्या आगमना बरोबर हमखास आठवते ती सोलापूरची गड्ड्याची जत्रा आणि मग डोळ्यापुढे एकेका प्रसंगाची मालिकाच उभी राहते   सोलापूरच ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वरचा विवाह सोहळा पहाण्यासाठी जमलेला लाखोंचा जनसमुदाय ,नंदिकोलची मिरवणूक , हस्तकला प्रदर्शन आणि त्यातल्या पाककला स्पर्धेत इतर पदार्था सोबत सामील झालेली. पारदर्शक ,पातळ , हिरवी ,टम्म फुगलेली भाकरी .
                   सोलापूर हे कर्नाटक ,मराठवाडा आंध्र  आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरच बहुभाषिक शहर असंख्य जातीन गजबजलेल हे शहर संक्रांतीला आपली जातपात विसरून एकत्र येत सगळ्या जाती धर्मात साजरा होणारा हा सण, पण सोलापूरची संक्रांत मात्र आगळी वेगळी म्हणूनच आपल वैशिष्ट जपणारी इथल्या लिंगायत वाणी समाजाच आराध्य दैवत असलेल्या सिद्धेश्वरच्या यात्रेमुळे त्याला विशेष महत्व प्राप्त झालय सोलापुरी चादर ,टावेल ,हातमागा बरोबरच सोलापूर ओळ्खल जात ते इथल्या सिद्धेश्वर मंदिरामुळे तिन्ही बाजूने तळे,एका बाजूने किल्ल्याजवळून जाणारी पायवाट तर दुसरीकडे गणपतीघाट मध्ये मंदिर ,पार्क मैदाना जवळ मंदीराच प्रवेशद्वार ,तिथूनच मंदिराकडे जाण्यासाठी लोखंडी पूल ,मंदिरात नावेतूनही जाता येत.
                        सिद्धेश्वर हे शिव स्वरूप ,रेवण सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने त्यांनी एका जंगम घराण्यात जन्म घेतला अशी आख्यायिका सांगितल्या जाते आणि याच सिद्धेश्वरा सोबत स्त्री जन्म घेतलेल्या पार्वतीला लग्न करायचं होत पण सिद्धेश्वर योगी पुरुष असल्यान त्यांनी नकार दिला तेव्हा तीन निराशेन जीव दिला मग तिचच प्रतीक म्हणजे नंदिकोल किव्हा काठया यांच लग्न संक्रांतीला ,सिद्धेश्वरा सोबत लावलं जात तीच ही सिद्धेश्वर यात्रा पुढे त्यांनी जिवंत समाधी घेतली त्यांचा जन्म देखील संक्रांतीचा म्हणून ह्या पर्वाला विशेष महत्व आहे ही यात्रा जिथे भरते तिथे आधी खड्डा होता म्हणून त्याला गड्ड्याची जत्रा अस नाव पडल ते आजतागायत तसच आहे.सिद्धेश्वर हे कवी आणि समाजसेवक असल्याचीही माहिती सांगितल्या जाते
त्यांनी आपल्या कार्यकाळात  तळे .,बंधारे बांधले तसेच त्यांनी सर्व जातींना एकसंघ करण्याचा प्रयत्न
केल्याचेही सांगितल्या जाते
                   संक्रांतीच्या काळात नंदिकोल नामक २५-३० फुटाच्या आणि जवळपास शंभर किलो वजनाच्या काठयांची शहरातून मिरवणूक निघते चांदीच नक्षीकाम केलेल्या या काठ्या वर झुंबरवजा चमकीच्या कागदाचा गोल आकार ,त्याला लटकणारया रंगीबेरंगी सुरनळ्याची आरास ह्या मुळे काठ्या हलताना खूप सुरेख दिसतात य़ा काठया मल्लिकार्जुन मंदिरातून सिद्धेश्वराच्या मंदिरात मिरवणुकीने नेतात अशा सात काठ्या धरण्याचा मान जंगम असलेले हब्बु घराणे ,देशमुख,सोनार,माळी ,मातंग अशा सारयांना क्रमवारीने दिल्या जातो या निमित्ताने सर्व जातीचा सुरेख समन्वय साधला जातो या काठ्या धरण्यासाठी धोतर ,बाराबंदी पोटाला काठी बांधण्यासाठी पाठोडे असा वेश असतो पोटात पाण्याचा थेंबही न घेता हे वजन पेलण म्हणजे एक कसरतच.  सातआठ दिवस आधी शहरातून रोज नंदिकोलची मिरवणूक निघते ठिकठीकाणी लोक त्यांची पूजा करतात ,केळे ,पेढ्यांचा नैवैध्य दाखवतात.
                   ह्या दिवसात पूर्वी शाळेत नंदिकोलची मिरवणूक हा विषय चित्रकलेसाठी ठरलेला असे संक्रांतीच्या दिवशी लोक सिद्धेश्वराच्या देवळात अक्षदा साठी जाण्यासाठी गडबड करत कारण उशीर झाला तर जागा मिळत नसे आता तर गर्दी कित्येक पटीन वाढलीय ह्या काळात सोलापूरकरांचे नातेवाईक,आजूबाजूचे लोक खास हा सोहळा पाहण्यासाठी येतात त्या मुळे घरे  पाहुण्यांनी भरलेली असतात मंदिराचा परिसर गर्दीन फुलतो ,  मला आठवतंय लहानपणी मंदिरात  इतकी तुडुंब गर्दी असे की ,मुंगी  जायलाही वाट नसे कित्येक जण  गर्दीत गुदमरत ,बेशुद्ध पडत क्वचित कोणी बुडून मेल्याचही कानी येई पण लोकांची गर्दी काही कमी होत नसे मंदिर परिसरातली जागा भरली की ,लोक जवळच्या पार्क मैदानावर गर्दी करत तिथून खालचा विवाह सोहळा दिसे फुलांनी सुशोभित केलेल्या संमती मंडपात ,शहरातून ६७ लिंगांना तैलाभिषेक करून आणलेल्या काठ्या मिरवत आणतात एका काठीला नागफळी ,व इतर काठयांना बाशिग बांधल जात मग मंत्रोच्चारात मंगलाष्टकाच्या गजरात वाजत गाजत धूम धडाक्यात सिद्धेश्वरा सोबत त्यांचा विवाह केल्या जातो लोक अक्षदा टाकतात सारेच उत्साहात आपल्या घरच लग्न असल्यागत  नटून थटून विवाहात सहभागी होतात  .
                      अक्षदा पडल्या की लोक मनसोक्त गड्ड्याच्या जत्रेत फिरून घरी परततात ,त्या दिवशी खास बाजरीच्या पातळ भाकऱ्या,आणि सर्व फळभाज्या ,पालेभाज्या ,कडधान्य,बोर,पेरू,ढाळा घालून केलेली
" भज्जी "सोबत तिळगुळ घालून केलेल्या पातळ कडक पोळ्या असा खास मेनू असतो लिंगायत वाण्यांची खासियत म्हणजे या पातळ ,कडक पारदर्शक अन टम्म फुगलेल्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकऱ्या ,आणि आता फ़ेमस झालेली खास सोलापुरची शेंगदाणा चटणी . हा सारा मेनू सणानिमित्य कानडी लोक परिचितांकडे देतात मंदिरात या यात्रेनिमित्य विविध स्पर्धा होतात सिद्धेश्वर हे लिंगायतांच आराध्य दैवत म्हणूनच कि काय या प्रदर्शनात चक्क भाकरीला पण स्थान असे आताच माहित नाही पण पूर्वी भाकारीचीही स्पर्धा असे उत्कृष्ट पातळ ,पारदर्शक भाकरीला बक्षीस असे आणि हे फक्त कानडी बायकाच करू जाणे !
दुसरया दिवशी होममैदानावर होमहवनाचा कार्यक्रम होतो तिथे नंदिकोल मिरवणुकीने नेतात देवीची पूजा होते ,तसे नंदिकोल आधी पाण्यात स्नान घालून शिवलिंगाजवळ गंगापूजन केल जात.                
                    तिसरया दिवशी रात्री शोभेच दारूकाम म्हणजे फटाक्याची आतषबाजी होते वेगवेगळे कलावंत आपली चित्तथरारक कला सादर करतात जळत्या रिंगातून उडी मारणे ,उंचावरून आगीच्या जाळात उडी घेणे ,रॉकेल पिउन तोंडातून जाळ काढणे वगैरे सर्व प्रकार ते आगप्रतिबंधक कपडे वापरून करीत ,पण पाहणाऱ्याचा मात्र थरकाप उडे .तेव्हा  हा प्रकार नवीनच होता नंतर काठ्या  मालीकार्जुन मंदिरात जात.तिथे कापड फाडण्याचा कार्यक्रम होई व यात्रा संपे .
       तशी  गडड्याची जत्रा वर्षातून दोनदा भरते  .एकदा श्रावणात अन दुसरी संक्रांतीला क़िल्ल्याच्या वाटेने जाताना लोक घाबरत कारण तिथे भूत आहे अशी अफवा होती. खरेतर दिवसा काही गवळ्याच्या बायका शेणाच्या गोवरया  करून किल्ल्याच्या भिंतीवर थापताना आम्हाला शाळेतून दिसत  आता तर तिथे सुंदर बागच झालीय. वाटेत लागणाऱ्या शोभिवंत पुलाखाली कधीमधी साप दिसत . महिनाभर चालणारया या यात्रेत दूरवरचे लोक आपली दुकाने थाटत .त्यात  बांगडीवाले ,कपडे,मौत का कुआ ,मिठाईवाले ,तमाशावाले ,अपंग कलावंत असत. सोबत रसवंती ,आइस्क्रीम वगैरे खाद्ययात्रा असेच.  तेव्हा फोटो क्रांती आताच्या सारखी झालेली नव्हती त्या मुळे  . तिथे तबडतोब मिळणारा डबलरोल फोटो काढण लोकांच्या आकर्षणाच केंद्र होत .पाहुणे मंडळी आली की ,हमखास गडड्याच्या जत्रेची सफर होईच. विदर्भात पण संक्रांत साजरी होतेच ,पण सोलापूरची संक्रांत काही औरच !

No comments:

Post a Comment