Friday 17 January 2014

यवतमाळ ते औरंगाबाद रस्त्याची दुरावस्था


                   यवतमाळ येथून कारंजा ,मेहकर,सिंदखेडराजा ,जालना,औरंगाबाद ह्या मार्गावरील रस्ता जागोजागी उखडलेला, वाहतुकिस  अत्यंत खराब अवस्थेत असून तेथे येणाऱ्या जाण्याऱ्या प्रवाशास त्याचा अत्यंत त्रास होत आहे विशेषत: रात्रीच्या वेळेस प्रवास करणारया प्रवाश्यांना व वाहन धारकांना त्याचा खूप त्रास होतोच शिवाय गाड्यांचीही अवस्था खराब होते अडचणीच्या वेळेस एखाद्या गावी वेळेवर पोहचता येत नाही आणि खराब रस्त्यामुळे वेळ व पैसे दोन्हीही वाया जातात.
                 रस्ता खराब मात्र जागोजागी टोल वसुली मात्र व्यवस्थित सुरु
 रस्ता जागोजागी उखडलेला असला तरीही इथली टोल वसुली थोड्या थोड्या अंतराने व्यवस्थित सुरु आहे ज्या तत्परतेने टोल वसूल केल्या जातो त्या तत्परतेने रस्ता मात्र दुरुस्त होत नाही हि टोल वसुली कोठे सत्तावीस,कोठे तीस ,पस्तीस ह्या दराने लहान गाडीस जवळपास सात,आठ वेळेस तरी  होतेच
ह्या रस्त्यावर इतके टोल नाके आहेत की   काही जण गमतीने म्हणतात की थोडा वेळ जर टोल नका दिसला नाही की  चुकल्या ,चुकल्या सारख वाटत.  तर काही जण  म्हणतात कि, थोडा वेळ टोल  नाका दिसला नाही कि हायस  वाटत पण कसच काय पुन्हा टोल नाका येतोच  पूर्वी प्रवास करताना रस्त्यात देऊळ दिसले कि लोक नमस्कार करून दक्षिणा टाकत पण आता टोल नाक्यावर थांबून टोल द्यावा लागतो असही काही जण म्हणतात.
    दररोज ह्या मार्गावरून लहान गाडया ,बसेस ,ट्रक  मिनी ट्रक ,Travels  ये,जा करतात इतक्या टोल नाक्यावर त्या थाबतात व टोल भरतात  त्याचा हिशोब केल्यास दररोज हजारो रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होतात मग रस्ते दुरुस्त का होत नाहीत.
.सद्या कोल्हापुरात टोल विरोधी जोरदार आंदोलन सुरु आहे लोकांचा प्रक्षोभ होऊन टोल नाकाच जाळण्यात आला राजू शेट्टी यांनी "टोलमुक्त महराष्ट्र" करणार अशी घोषणा केली आहे युतीच्या काळात रस्ते बांधणी प्रकल्प राबवण्यात आला ह्या रस्त्याच्या बांधणीच काम कंत्राटदारांना देण्यात आले काही ठिकाणी रस्ते झाले तर काही ठिकाणचे रस्ते खराबच राहिले  युती सरकारच्या काळात टोल नाके सुरु झाले तरी रस्त्याचा खर्च वसूल होताच व  रस्ते दुरुस्त होताच  टोल वसुली बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता सरकार बदलून बरीच वर्ष झाली रस्ते दुरुस्त होऊन रस्त्याचा खर्चही वसूल झाला तरीही टोल नाक्यावर टोल वसूल होतोच.खराब रस्ता असताना व  टोल वसूल करूनही रस्ता दुरुस्त न झाल्याने जनतेची फसवणूक होत आहे तरी संबंधितांनी ह्या कडे लक्ष देवून रस्ते तर दुरुस्त करावेच शिवाय जिथली टोल वसुलीची मुदत संपलीय तिथली टोल वसुली त्वरित  बंद करावी .


Monday 13 January 2014

गड्ड्याची जत्रा

                          नुकतीच सोलापुरात दहशतवादी संघटनेशी संबंधीत   सिमीच्या दोन कार्यकर्त्यांना सिद्धेश्वर यात्रेच्या वेळेस घातपाती कारवाई करण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली ह्या साठी मध्य प्रदेश पोलिस व ए. टी एस च्या सतर्क पोलिस यंत्रणेच कौतुकच करायला हव.
                             हि सिद्धेश्वर यात्रा कित्येक वर्षापासून अगदी आमच्या जन्माच्याही आधीपासून निर्विघ्न पार पडत आलीय हि यात्रा संक्रांतीला भरते.अजूनही मला  मकर संक्रांतीच्या आगमना बरोबर हमखास आठवते ती सोलापूरची गड्ड्याची जत्रा आणि मग डोळ्यापुढे एकेका प्रसंगाची मालिकाच उभी राहते   सोलापूरच ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वरचा विवाह सोहळा पहाण्यासाठी जमलेला लाखोंचा जनसमुदाय ,नंदिकोलची मिरवणूक , हस्तकला प्रदर्शन आणि त्यातल्या पाककला स्पर्धेत इतर पदार्था सोबत सामील झालेली. पारदर्शक ,पातळ , हिरवी ,टम्म फुगलेली भाकरी .
                   सोलापूर हे कर्नाटक ,मराठवाडा आंध्र  आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरच बहुभाषिक शहर असंख्य जातीन गजबजलेल हे शहर संक्रांतीला आपली जातपात विसरून एकत्र येत सगळ्या जाती धर्मात साजरा होणारा हा सण, पण सोलापूरची संक्रांत मात्र आगळी वेगळी म्हणूनच आपल वैशिष्ट जपणारी इथल्या लिंगायत वाणी समाजाच आराध्य दैवत असलेल्या सिद्धेश्वरच्या यात्रेमुळे त्याला विशेष महत्व प्राप्त झालय सोलापुरी चादर ,टावेल ,हातमागा बरोबरच सोलापूर ओळ्खल जात ते इथल्या सिद्धेश्वर मंदिरामुळे तिन्ही बाजूने तळे,एका बाजूने किल्ल्याजवळून जाणारी पायवाट तर दुसरीकडे गणपतीघाट मध्ये मंदिर ,पार्क मैदाना जवळ मंदीराच प्रवेशद्वार ,तिथूनच मंदिराकडे जाण्यासाठी लोखंडी पूल ,मंदिरात नावेतूनही जाता येत.
                        सिद्धेश्वर हे शिव स्वरूप ,रेवण सिद्धेश्वराच्या आशीर्वादाने त्यांनी एका जंगम घराण्यात जन्म घेतला अशी आख्यायिका सांगितल्या जाते आणि याच सिद्धेश्वरा सोबत स्त्री जन्म घेतलेल्या पार्वतीला लग्न करायचं होत पण सिद्धेश्वर योगी पुरुष असल्यान त्यांनी नकार दिला तेव्हा तीन निराशेन जीव दिला मग तिचच प्रतीक म्हणजे नंदिकोल किव्हा काठया यांच लग्न संक्रांतीला ,सिद्धेश्वरा सोबत लावलं जात तीच ही सिद्धेश्वर यात्रा पुढे त्यांनी जिवंत समाधी घेतली त्यांचा जन्म देखील संक्रांतीचा म्हणून ह्या पर्वाला विशेष महत्व आहे ही यात्रा जिथे भरते तिथे आधी खड्डा होता म्हणून त्याला गड्ड्याची जत्रा अस नाव पडल ते आजतागायत तसच आहे.सिद्धेश्वर हे कवी आणि समाजसेवक असल्याचीही माहिती सांगितल्या जाते
त्यांनी आपल्या कार्यकाळात  तळे .,बंधारे बांधले तसेच त्यांनी सर्व जातींना एकसंघ करण्याचा प्रयत्न
केल्याचेही सांगितल्या जाते
                   संक्रांतीच्या काळात नंदिकोल नामक २५-३० फुटाच्या आणि जवळपास शंभर किलो वजनाच्या काठयांची शहरातून मिरवणूक निघते चांदीच नक्षीकाम केलेल्या या काठ्या वर झुंबरवजा चमकीच्या कागदाचा गोल आकार ,त्याला लटकणारया रंगीबेरंगी सुरनळ्याची आरास ह्या मुळे काठ्या हलताना खूप सुरेख दिसतात य़ा काठया मल्लिकार्जुन मंदिरातून सिद्धेश्वराच्या मंदिरात मिरवणुकीने नेतात अशा सात काठ्या धरण्याचा मान जंगम असलेले हब्बु घराणे ,देशमुख,सोनार,माळी ,मातंग अशा सारयांना क्रमवारीने दिल्या जातो या निमित्ताने सर्व जातीचा सुरेख समन्वय साधला जातो या काठ्या धरण्यासाठी धोतर ,बाराबंदी पोटाला काठी बांधण्यासाठी पाठोडे असा वेश असतो पोटात पाण्याचा थेंबही न घेता हे वजन पेलण म्हणजे एक कसरतच.  सातआठ दिवस आधी शहरातून रोज नंदिकोलची मिरवणूक निघते ठिकठीकाणी लोक त्यांची पूजा करतात ,केळे ,पेढ्यांचा नैवैध्य दाखवतात.
                   ह्या दिवसात पूर्वी शाळेत नंदिकोलची मिरवणूक हा विषय चित्रकलेसाठी ठरलेला असे संक्रांतीच्या दिवशी लोक सिद्धेश्वराच्या देवळात अक्षदा साठी जाण्यासाठी गडबड करत कारण उशीर झाला तर जागा मिळत नसे आता तर गर्दी कित्येक पटीन वाढलीय ह्या काळात सोलापूरकरांचे नातेवाईक,आजूबाजूचे लोक खास हा सोहळा पाहण्यासाठी येतात त्या मुळे घरे  पाहुण्यांनी भरलेली असतात मंदिराचा परिसर गर्दीन फुलतो ,  मला आठवतंय लहानपणी मंदिरात  इतकी तुडुंब गर्दी असे की ,मुंगी  जायलाही वाट नसे कित्येक जण  गर्दीत गुदमरत ,बेशुद्ध पडत क्वचित कोणी बुडून मेल्याचही कानी येई पण लोकांची गर्दी काही कमी होत नसे मंदिर परिसरातली जागा भरली की ,लोक जवळच्या पार्क मैदानावर गर्दी करत तिथून खालचा विवाह सोहळा दिसे फुलांनी सुशोभित केलेल्या संमती मंडपात ,शहरातून ६७ लिंगांना तैलाभिषेक करून आणलेल्या काठ्या मिरवत आणतात एका काठीला नागफळी ,व इतर काठयांना बाशिग बांधल जात मग मंत्रोच्चारात मंगलाष्टकाच्या गजरात वाजत गाजत धूम धडाक्यात सिद्धेश्वरा सोबत त्यांचा विवाह केल्या जातो लोक अक्षदा टाकतात सारेच उत्साहात आपल्या घरच लग्न असल्यागत  नटून थटून विवाहात सहभागी होतात  .
                      अक्षदा पडल्या की लोक मनसोक्त गड्ड्याच्या जत्रेत फिरून घरी परततात ,त्या दिवशी खास बाजरीच्या पातळ भाकऱ्या,आणि सर्व फळभाज्या ,पालेभाज्या ,कडधान्य,बोर,पेरू,ढाळा घालून केलेली
" भज्जी "सोबत तिळगुळ घालून केलेल्या पातळ कडक पोळ्या असा खास मेनू असतो लिंगायत वाण्यांची खासियत म्हणजे या पातळ ,कडक पारदर्शक अन टम्म फुगलेल्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकऱ्या ,आणि आता फ़ेमस झालेली खास सोलापुरची शेंगदाणा चटणी . हा सारा मेनू सणानिमित्य कानडी लोक परिचितांकडे देतात मंदिरात या यात्रेनिमित्य विविध स्पर्धा होतात सिद्धेश्वर हे लिंगायतांच आराध्य दैवत म्हणूनच कि काय या प्रदर्शनात चक्क भाकरीला पण स्थान असे आताच माहित नाही पण पूर्वी भाकारीचीही स्पर्धा असे उत्कृष्ट पातळ ,पारदर्शक भाकरीला बक्षीस असे आणि हे फक्त कानडी बायकाच करू जाणे !
दुसरया दिवशी होममैदानावर होमहवनाचा कार्यक्रम होतो तिथे नंदिकोल मिरवणुकीने नेतात देवीची पूजा होते ,तसे नंदिकोल आधी पाण्यात स्नान घालून शिवलिंगाजवळ गंगापूजन केल जात.                
                    तिसरया दिवशी रात्री शोभेच दारूकाम म्हणजे फटाक्याची आतषबाजी होते वेगवेगळे कलावंत आपली चित्तथरारक कला सादर करतात जळत्या रिंगातून उडी मारणे ,उंचावरून आगीच्या जाळात उडी घेणे ,रॉकेल पिउन तोंडातून जाळ काढणे वगैरे सर्व प्रकार ते आगप्रतिबंधक कपडे वापरून करीत ,पण पाहणाऱ्याचा मात्र थरकाप उडे .तेव्हा  हा प्रकार नवीनच होता नंतर काठ्या  मालीकार्जुन मंदिरात जात.तिथे कापड फाडण्याचा कार्यक्रम होई व यात्रा संपे .
       तशी  गडड्याची जत्रा वर्षातून दोनदा भरते  .एकदा श्रावणात अन दुसरी संक्रांतीला क़िल्ल्याच्या वाटेने जाताना लोक घाबरत कारण तिथे भूत आहे अशी अफवा होती. खरेतर दिवसा काही गवळ्याच्या बायका शेणाच्या गोवरया  करून किल्ल्याच्या भिंतीवर थापताना आम्हाला शाळेतून दिसत  आता तर तिथे सुंदर बागच झालीय. वाटेत लागणाऱ्या शोभिवंत पुलाखाली कधीमधी साप दिसत . महिनाभर चालणारया या यात्रेत दूरवरचे लोक आपली दुकाने थाटत .त्यात  बांगडीवाले ,कपडे,मौत का कुआ ,मिठाईवाले ,तमाशावाले ,अपंग कलावंत असत. सोबत रसवंती ,आइस्क्रीम वगैरे खाद्ययात्रा असेच.  तेव्हा फोटो क्रांती आताच्या सारखी झालेली नव्हती त्या मुळे  . तिथे तबडतोब मिळणारा डबलरोल फोटो काढण लोकांच्या आकर्षणाच केंद्र होत .पाहुणे मंडळी आली की ,हमखास गडड्याच्या जत्रेची सफर होईच. विदर्भात पण संक्रांत साजरी होतेच ,पण सोलापूरची संक्रांत काही औरच !

Saturday 11 January 2014

रम्य ते सिनेमाचे दिवस

             सद्या सिनेमाच शताब्दी वर्ष सुरु आहे टी वि.वरून सिनेमा बद्दलच्या सुवर्ण वर्षातल्या आठवणीची पर्वणी सिनेरसिकांना अनुभवायला मिळतेय त्या काळातल्या सिनेमाची रोचक माहिती,दुर्मिळ छायाचीत्रे,सिनेमाच्या जडण घडणीचे किस्से,त्या वेळेस आलेल्या अडचणी ह्या अनुभवांची पोथडीच आपल्या पुढे टी.वि.माध्यमाने रिती केलीय त्या वेळेसचे दिग्दर्शक,निर्माते,कलाकार ह्या साऱ्यांचा तो अविस्मरणीय काळ सिने सुवर्ण वर्षात टी.वि.मुळे आपल्याही भेटीस आलाय.
                   दादासाहेब फाळके ह्यांना पहिला मराठी सिनेमा काढताना आलेला रोमहर्षक अनुभव आपल्याला "हरिश्चन्द्राचि फ्याक्टरी"ह्या सिनेमातून पाहायला मिळाला आणि सिनेमा पडद्यावर दिसावा म्हणून त्यांनी केलेला संघर्ष आपण अनुभवला आता बटन दाबताच टी.वि.वर आपण सहजतेन हवा तेव्हा हवा तो सिनेमा पाहत असताना तर आपण त्यांचे ऋण मानायलाच हवे.
             सिनेमावाल्यांसाठी,सिनेमासाठी आणि सिनेमे पाहणारयांसाठी खरोखरच तो सुवर्ण संघर्ष काळ होता सिने रसिकांसाठी सिनेमा पाहायला मिळणे म्हणजे जणू आनंदाची पर्वणीच म्हणूनच सिनेमा पाहायला जायचा दिवस सिनेमामय होवून जाई शहरी रसिकांसाठी जर सिनेमा चांगला आणि हाउसफुल असेल आणि तो थोड्याच दिवसासाठी आलेला असेल तर आधी सकाळीच बसने जाऊन advance बुकिंग कराव लागे कधी,कधी लवकरच advance बुकिंग संपे.रांगेत black ने तिकीट विकणारेच जास्त असत सुशिक्षित लोक सहसा black च तिकीट घेत नसत blackच्या तिकिटाच्या दरात "शोलेन"विक्रम केला होता तसाच जास्त दिवस थियेटर मध्ये राहण्याच्याही बाबतीतही.एकदा तिकीट मिळाल कि मग पुन्हा दुपारी बसन थियेटर गाठण्याची कसरत करावी लागे त्यातही बस जर गर्दीन भरून आली आणि दोन तीन बसेस न थांबता गेल्या कि मग सिनेमा आधीची जाहिरात,माहितीपट आणि कधी,कधी सिनेमाची सुरुवातही गेल्याची चुटपूट लागे कारण तेव्हा टी वी नव्हता आणि जाहिराती चांगल्या असत आता टी वी वर सतत नको त्या घाणेरड्या जाहिरातीचा मारा सुरु असतो आणि नको ती जाहिरात पाहणे "!म्हणून प्रेक्षक channels बदलवत असतो.
             दर्जेदार दिग्दर्शकाच कुशल दिग्दर्शन उत्कृष्ठ कथानक,सुमधुर गीते,सुरेल संगीत आणि दर्जेदार कलावंताचा दर्जेदार अभिनय.विनोदी कलावंताचा कुठलाही पाचकळपणा न करता केलेला अवखळ निखळ विनोद आणि अभिजात नृत्याविष्कार एक हलका फुलका मनोरंजक सिनेमा पाहायला मिळाल्याच्या आनंदात प्रेक्षक चित्रपटगृहा बाहेर पडत.
           सोलापुरात तेव्हा पंधरा ,सोळा सिनेमा गृहे होती उमा थियेटरच इंटिरियर पाहण्यासाठी खास बाहेरगावाहून लोक येत असच मुंबईच"मराठा मंदिर"ही फ़ेमस होत तिथे आम्ही जया भादुडीचा "कोरा कागज" हा सिनेमा पहिला होता काहीत भाषिक सिनेमे लागत.काही कन्नड मैत्रिणींच्या आग्रहाखातर आम्ही श्रीदेवीचा कन्नड सिनेमा पहिला होता त्यात साधी सुधी श्रीदेवी हिरोइन होते अशी कथा होती तेव्हाचा श्रीदेवीचा अभिनय ते आताच्या इंग्लिश विग्लीश पर्यंतचा तिचा अभिनय खरोखरच लाजवाब! सोलापुरात बरीच सिनेमागृहे एकाच ठिकाणी असल्याने त्याला थियेटर अस नाव पडल आणि त्याचा एक फायदा होई जर वेळेवर तिकीट मिळाल नाही तर दुसरया सिनेमाला जाता येई आमच्या शाळेच्या फाटकाला शाळा सुरु झाली कि कुलूप लागे कारण "सरला येवलेकर"सिनेमात काम करण्यासाठी शाळेतून पळून गेली अस आम्हाला सांगण्यात येई  काही मराठी गाजलेले चांगले सिनेमे मराठी सिनेसप्ताहात लागत तेव्हा आम्हाला माणूस,शेजारी,कुंकू असे एकाहून एक सरस सिनेमे पाहायला मिळत."पोसायडन adventure",बर्निंग ट्रेन"," Enter the Dragon" अशा धैर्यपटातील थरार आम्ही अनुभवला.
      जुने सिनेमे matinee ला लागत आणि ते फक्त बारा ते तीन ह्या वेळातच दाखवत चोरीचोरी,अनारकली, मुगलेआझम, आवारा,चारसोबीस,चालती का नाम गाडी या सिनेमांना लोक खूप गर्दी करत त्यातल्या नृत्यावर पैसे उधळत ह्या सिनेमांची गाणी कथा दिग्दर्शन आणि राजकपूर नर्गिस,मधुबाला मीनाकुमारी,किशोरकुमार दिलीपकुमार ह्या साऱ्यांचाच अविस्मरणीय सहज सुंदर अभिनय,सारच अलौकिक! अजरामर!आजच्या तरुणाईलाही भुरळ पाडणार!
         राज कपूर ,गुरुदत्त हृषीकेश मुखर्जी,गोविंद निहलानी,किशोर कुमार ,कमाल अमरोही, यश चोप्रा या सारख्या दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाला खरोखरच तोड नाही सिनेमांची गाणीही ओठावर रेंगाळणारया चालीची,पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी, गुणगुणावीशी वाटणारी असत पण ती आठवडयातून एकदाच रेडीओ वर"बिनाका गीतमाला" ह्या कार्यक्रमातून लागत आणि लोकप्रियते नुसार त्यांचे नंबर लागत मग कोणते गाणे पहली पायदानपर ह्याची ऊत्सुकता सारयांना असे.गीतकारांनी लिहलेल्या गीताचे बोलही चांगले असत.
         सिनेमाची स्टोरी लोकांच्या आवडीनुसार बदले tragedy,कॉमेडी,रोमांटीक,थरारपट सारेच सिनेमे चांगले असत राजेश खन्ना, जितेंद्र,ऋषी कपूरचा रोमांटीक हिरो असो कि फारुख शेख,सचिन सारखा साधाभोळा मध्यम वर्गोय हिरो लोक त्यांना डोक्यावर घेत जया,रेखा,दीप्ती नवल,शबाना,टीना मुनीम,स्मिता पाटील रंजिता ह्यांचे अखियोंके झरोकेसे, रजनीगंधा, मिली, खुबसुरत उंबरठा,नदीयाके उस पार,खट्टीमिठी असे अनेक सिनेमे तेव्हा गाजले वहिदा,बबिता आशा पारेख साधना, राखी, शर्मिला,माला सिन्हा,हेमा,मुमताज, नीतू सिंग ह्यांनीही एक काळ गाजवला.
         ह्या सिने कलावंताचं प्रचंड कुतूहल तेव्हा असे त्यांचं हसण,दिसण त्यांची वेशभूषा केशभूषा ह्याच अनुकरण तेव्हाची पिढी करत असे साधनाकट नीतू कट,डिम्पल कटची तेव्हा fashionहोती.नीतूची बेल बॉटम pant,झीनतची लुंगी कुडता, जयाचा घागरा,शरारा टीना मुनीमची मिडी,रेखा,हेमा,शबानाच्या सिल्क सुती साड्या,जयाची एक वेणी, रेखाच्या दोन वेण्या,शबानाचा अंबाडा बॉबी प्रिंट चे ड्रेस ,मोठे कानातले रिंग मिनी स्कर्ट,आणिआधीच्या हिरोइनच्या हेअर स्टाइल्स तरुणीत फ़ेमस होत्या तर अमिताभ,राजेशचा ड्रेस, हेअरकटचीही fashion तरुणात होती.
           त्या वेळेस मोती,मण्या खडे,प्लास्टिक पोवळे ह्यांचे सेट्स ब्रेसलेट, घुंगरूच्या अंगठ्यांची fashion होती मुमताझ सारख्या लोकरीने विणलेल्या फुलांची साडी, तर आता fashion मध्ये आलेल्या जडाऊ वर्कच्या साड्याची, तंग सलवार कुडता, slacks चीही fashion होती.
                     एखादा सिनेमा आवडला कि तो कित्येक वेळा पहाणारे रसिक असत आणि त्याला वयाचही बंधन नसे ऋत्विक रोशनचा "कहो ना प्यार है "हा सिनेमा यवतमाळ इथल्या एका सत्तर वर्षीय आजीन तब्बल सत्तर वेळा पहिला होता आणि त्या साठी इथल्या थियेटर मालकाने तिचा सत्कारही केला होता.
       काळ बदलला टी.वि.,कॉम्पुटर,मोबाईल क्रांती झाली आता नवनवीन सिनेमे घरबसल्या पाहायला मिळताहेत हे खरच वाखाणण्याजोगे आहे पण काही निवडक सिनेमेच चांगल्या ह्या प्रकारात मोडतात नाही तर त्याच,त्याच नावाचे जुने सिनेमे रिमिक्स करून पुन्हा रिलीज करण्याचा नवा ट्रेंड सुरु आहे पण त्याला जुन्याची सर नाही त्यातली नको ती घाणेरडी,सतत दाखवली जाणारी दृश्ये पाहून सेन्सर बोर्ड अस्तित्वात आहे कि नाही असा प्रश्न पडतो आताही नवनवीन कथेवर किंवा जून्या चांगल्या लेखकांच्या कथेवर चांगले सिनेमे निघाले तर लोक ते आवर्जून पाहतील.